लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे पाच महिन्यांचे मानधन थकीत असून, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन आणि बैठक भत्ता रखडला आहे. उत्सवांची रेलचेल आणि देणग्यांसाठी कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका पाहता थकीत मानधनाच्या मुद्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होऊन मनपात दाखल होणार्या नगरसेवकांना मानधन देण्याची तरतूद आहे. ‘ड’ वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना साडेसात हजार रुपये मानधन दिले जात होते. राज्य शासनाने मानधनाच्या रकमेत वाढ करून जून महिन्यापासून दहा हजार रुपये मानधन देण्याचे निर्देश दिले आहेत. नगरसेवकांच्या मानधनात वाढ झाली असली, तरी मागील पाच महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले आहे. ८ मार्चपासून ते ८ ऑगस्टपर्यंत नवनिर्वाचित नगरसेवकांचे २८ लाख ८१ हजार मानधनाची रक्कम थकीत आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता, ही रक्कम प्रशासनाने अदा करण्याची गरज असल्याची भावना सर्वपक्षीय नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.
माजी नगरसेवकांचे मानधन रखडले!फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. ८ मार्चपासून नवनिर्वाचित नगरसेवकांनी कामकाज सांभाळले. यादरम्यान, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन रखडल्याची माहिती आहे. ऑक्टोबर २0१६ ते मार्च २0१७ पर्यंत माजी नगरसेवकांचे ३0 लाख ७४ हजार रुपयांचे मानधन थकीत आहे. यामध्ये बैठक भत्त्याचा समावेश आहे.
जून महिन्यापासून रकमेत वाढनगरसेवकांना दिल्या जाणार्या मानधनाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने १२ जूननंतर लागू केला. अर्थात प्रशासनाला जून महिन्यापासून नगरसेवकांना दहा हजार रुपये मानधन अदा करावे लागेल. यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.