अकोला : महापालिकेला दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या १५ कोटींच्या अनुदानातून अद्यापही सहा सिमेंट रस्त्यांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या नसून, डांबरीकरणाच्या १२ रस्त्यांचे काम जाणीवपूर्वक संथगतीने सुरू आहे. संबंधित कंत्राटदार वेळकाढूपणा करीत असताना आयुक्तांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २0१३ मध्ये शासनाकडून १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. मागील दोन वर्षांपासून मनपात पडून असलेल्या निधीचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले. १५ कोटींमधून बारा डांबरीकरणाचे, तर सहा सिमेंट क ाँक्रिट रस्त्याचे निर्माण केले जाईल. शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, अकोलेकर मनपाच्या उदासीन कारभाराला प्रचंड वैतागले आहेत. १२ डांबरी रस्त्यांची निविदा मंजूर झाल्यानंतर ही कामे तातडीने सुरू होणे अपेक्षित होते. सद्य:स्थितीत केवळ पाच रस्त्यांची कामे प्राथमिक अवस्थेत सुरू असल्याचे चित्र आहे, तर उर्वरित सात रस्त्यांच्या दुरुस्तीला साधी सुरुवातही झाली नाही. दीड महिन्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर डांबरी रस्त्यांची कामे आपोआप बंद होतील. अर्थातच पावसाळ्य़ाची सबब पुढे करीत घाईघाईत डांबरी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करण्याचे कंत्राटदारांचे मनसुबे दिसून येतात. यामुळे जाणीवपूर्वक डांबरीकरणाच्या कामाला विलंब केला जात असताना मनपाचा बांधकाम विभाग झोपेत असल्याचे चित्र दिसून येते. याप्रकरणी आयुक्त सोमनाथ शेटे यांनी रोखठोक भूमिका घेण्याची मागणी अकोलेकरांनी केली आहे. यासंदर्भात शहर अभियंता अजय गुजर यांच्याजवळ विचारणा केली असता त्यांनी बुधवारी सिमेंट रस्त्यांच्या निविदा उघडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. कंत्राटदारांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवले जाईल, असेही ते म्हणाले.
डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी कंत्राटदारांचा वेळकाढूपणा
By admin | Updated: April 15, 2015 01:49 IST