अकोला -विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले ते, उमेदवारी अर्ज मागे घेणार्यांकडे. मतांचे विभाजन करू शकणार्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी स्वपक्षीयांसोबतच अपक्ष उमेदवारांचीही मनधरणी केली जात आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवसापर्यंत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, भारिप, मनसे, बसपासह इतर पक्षांच्या उमेदारांसोबतच अपक्ष उमेदवारांचाही भरणा मोठय़ा प्रमाणावर आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल करणार्या उमेदवारांवर आता सर्वच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. बाळापूर, मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व मतदारसंघात प्रामुख्याने भारिप-बमसं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार्यांची संख्या अधिक आहे. अकोला पूर्वमध्ये काँग्रेसचे दुसर्या फळीतील नेते पुरुषोत्तम दातकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी भारिप-बमसंतर्फे या मतदारसंघातून तिकीट मागितली होती. त्यामुळे त्यांनी पक्षातर्फेही एक अर्ज दाखल केला आहे. मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिभा अवचार यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. याशिवाय राकाँतर्फे अर्ज दाखल करणार्यांची या मतदारसंघात मोठी संख्या आहे. अकोला पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघात भाजपतर्फे डॉ. योगेश साहू यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार असतानाही त्यांचा अर्ज आहे. याशिवाय विजय अग्रवाल यांचाही अर्ज आहे.बाळापूरमध्ये काँग्रेसने नातिकोद्दिन खतीब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेले नारायणराव गव्हाणकर यांना लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही काँग्रेसच्या तिकिटापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मूर्तिजापूरमधून भारिप-बमसंने राहुल डोंगरे यांना एबी फॉर्म दिला. असे असतानाही तब्बल इतर पाच उमेदवारांनी येथून भारिप-बमसंतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यात श्यामराव वाहुरवाघ, संजय मुळे, संदीप दौलतराव सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर आणि भाऊराव सुरडकर यांचा समावेश आहे. गोपकर यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ** अपक्ष ठरणार अडचणीचे!स्वपक्षीय उमेदवारांसोबतच मतदारसंघातील जातीय समीकरणामध्ये अडचणीच्या ठरणार्या तुल्यबळ अपक्ष उमेदवारांवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे विशेष लक्ष आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून सर्वच मार्गांनी प्रयत्न सुरू झाले आहेत. १ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने तोपर्यंत त्यांची मनधरणी सुरू राहील.** मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यताआकोट आणि अकोला पूर्व या दोन्ही मतदारसंघात मराठा-कुणबी समाजातील उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मराठा समाजाची मतं विभागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वच पक्षांचे उमेदवार कामाला लागले आहेत.
उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी
By admin | Updated: September 29, 2014 02:11 IST