अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होतील. त्यानुषंगाने आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी बांधकाम विभागाची संपूर्ण चमू कामाला लावली आहे. शनिवारी आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून ठरावीक रस्त्यांची पाहणी करीत शहर अभियंत्यांना सूचना केल्या. शहरात कोण्याही रस्त्यावर चक्कर मारा, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न उपस्थित होतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अकोलेकरांची हाडे अक्षरश: खिळखिळी झाली आहेत. महापालिकेला मूलभूत सोयी-सुविधा व विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त २६ कोटींचा निधी केवळ सत्तापक्षाच्या अंतर्गत कलहामुळे पडून आहे. या निधीतून ५० टक्के रक्कम जमा करण्याची अट शासनाने नुक तीच शिथिल केली आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे प्राप्त १५ कोटींतून मुख्य १८ रस्त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे. यावर मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी लक्ष केंद्रित केले असून, ज्या रस्त्यांचा यादीमध्ये समावेश आहे, त्यांची प्रत्यक्षात पाहणी सुरू केली आहे. शहराची पाहणी करण्यासाठी मध्यरात्रीच घरातून बाहेर पडणार्या आयुक्तांनी दिवसासुद्धा हा फंडा सुरू केल्याने कर्मचार्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शनिवारी दुपारी अचानक बांधकाम विभागातील अधिकार्यांना सोबत घेऊन आयुक्तांनी महसूल कॉलनी व सुधीर कॉलनीमधील मुख्य रस्त्यांची पाहणी केली. जास्त लांबीचे रस्ते व त्यावरील खर्चाचा आयुक्तांनी भर रस्त्यावरच आढावा घेतला.
आयुक्त उतरले रस्त्यावर! मुख्य रस्त्यांची केली पाहणी
By admin | Updated: May 10, 2014 23:32 IST