विवेक चांदूरकर / अकोला अकोला : पाश्चात्त्य संस्कृतीचा भडीमार त्यात पॉप संगीताच्या वादळात शास्त्रीय संगीत टिकाव धरू शकेल की नाही, अशी भीती संगीतकार व्यक्त करीत असतानाच युवा महोत्सवातील स्थिती मात्र वेगळीच आहे. गत दोन दिवसांत ५२ महाविद्यालयातील १५0 च्या वर विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत व गझलचे कार्यक्रम सादर केले असून, खचाखच भरलेल्या सभागृहातील श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव सुरू आहे. महो त्सवाच्या दुसर्या दिवशी वसंत सभागृहात शास्त्रीय व सुगम संगीताचा कार्यक्रम सुरू आहे. सभागृहाबाहेरच लोकनृत्य व सोलो डान्सचा कार्यक्रम सुरू असताना वसंत सभागृहातील खुच्र्यांना प्रेक्षकांची वाट बघावी लागेल असे चित्र होते. मात्र, येथे तरुण प्रेक्षकांची गर्दी होती. विद्यार्थी तल्लीन होऊन गीत सादर करीत होते तर श्रोते टाळ्या वाजवून त्यांना भरभरून प्रतिसाद देत होते. **श्रोत्यांची साद अन परीक्षकांची दाद विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांनीही दाद दिली. परीक्षक ज्येष्ठ संगीतकार सुधाकर अंबूसकर म्हणाले की, तरुणांचा ओढा शस्त्रीय गायनाकडे दिसतो आहे. उपशास्त्रीय संगीतातही चांगल्या कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या आहेत. तरुण मुलेही आता शास्त्रीय गायनाकडे वळायला लागले असून, हे चित्र आशादायी असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे शास्त्रीय संगीताचे सादरीकरण व गझल गायनाची दाद दिली. मुलांचा रियाज, श्रम कमी पडत असले तरी त्यांचे प्रयत्न चांगले असल्याची प्रतिक्रिया परीक्षक जयश्री पुनतांबेकर यांनी व्यक्त केली.
शास्त्रीय संगीताची रंगली मैफल
By admin | Updated: September 20, 2014 00:51 IST