अकोला: किराणा दुकानातील काजू, बदामांवर ताव मारून अज्ञात चोरट्यांनी किरकोळ ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामदासपेठ परिसरात राहणारे विनीत कृष्णराव आसरकर(४९) यांचे मनपा मराठी शाळा क्रमांक ७ जवळ किराणा दुकान आहे. आसरकर बुधवारी रात्री दुकान बंद करून गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि गल्ल्यात पैसे शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु गल्ल्यात काही नाणी, दोन हजाराची नोट त्यांना मिळाली, तसेच दुकानातील पेनड्राईव्हसुद्धा त्यांनी चोरले. दरम्यान, त्यांच्या नजरेस दुकानातील कप्प्यामध्ये ठेवलेली काजू व बदामची पाकिटे दिसून आली. त्यांनी दुकानातच काजू व बदामची पाकिटे फोडून त्यावर ताव मारला आणि उरलेली पाकिटे त्यांनी लंपास केली. विनीत आसरकर यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
काजू, बदामांवर ताव मारून चोरट्यांनी केला ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 20:37 IST