- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता; परंतु शिक्षकांनी शिक्षक संघटनांच्या मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद दिल्यामुळे अमरावती विभागात आतापर्यंत केवळ ३२ हजार ५२0 शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. त्या दृष्टिकोनातून शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत.राज्यात अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यासाठी १ ते ३0 नोव्हेंबर हा कालावधी दिला होता. यादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात केवळ ३२ हजार ५२0 शिक्षकांची मतदार नोंदणी करण्यात आली. अमरावती विभागात शिक्षकांची संख्या ६0 हजारावर आहे; परंतु शिक्षकांनी मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद दिला. त्यामुळे ५0 टक्केच नोंदणी झाली आहे. ३0 नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा पार पडला. या टप्प्यात पाच ते सहा शिक्षक मतदारांनी नोंदणी केल्याचा अंदाज आहे.अद्यापही मतदार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. शिक्षक मतदारांची कमी झालेली नोंदणी पाहता, शिक्षक संघटनांच्या उमेदवारांना पहिल्या क्रमांकाची मते मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवारच विजयी होऊ शकतो. गत निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले होते. कमी शिक्षक मतदार नोंदणीमुळे उमेदवारांमध्ये शिक्षकांची मते खेचून आणण्यासाठी चांगलीच चढाओढ सुरू आहे. या चढाओढीत शिक्षक कोणाला साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)