खेट्री: चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चतारी येथे काका-पुतण्याच्या घरी चोरीचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील दुचाकी लंपास केली होती. परंतु दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चान्नी-पांगरा मार्गावरील कॅनॉलमध्ये टाकून दिली.
अज्ञात चोरट्यांनी निवृत्ती बनिये यांच्या घराचे दरवाजाचे साखळी तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर श्रीरंग बनीये यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोने चांदीचे दागिनेसह पैशांचा शोध घेतला, परंतु कपाटात दागिने व रोख नसल्याने चोरट्यांनी कपाटातील कपड्यांची नासधूस केली. चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरट्यांनी घरासमोरील दुचाकी चोरून उमराकडे नेत असताना दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने चोरट्यांनी दुचाकी कॅनॉलमध्ये फेकून देऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. अवघ्या तीन तासातच दुचाकीचा शोध लावून दुचाकी मालकाच्या सुपुर्द केले.
----------------------
दोन दिवसात दोन अपघात
वाडेगाव: वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या टी-पॉईंट ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत दोन दिवसांत दोन अपघाताच्या घटना घडल्या असून, या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. दि. १२ सप्टेंबर रविवार व १३ सप्टेंबर सोमवारी रोजी वाडेगाव-बाळापूर रस्त्यावरील दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटन घडली आहे, तर एक अपघात प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक वळणमार्गावर घडला आहे. जखमींना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.