बुलडाणा : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघासाठी आज २0 जून रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील ८२२ शिक्षक व प्राध्यापकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून त्याची टक्केवारी ७५.८३ एवढी आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात ७१.0४ टक्के शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज २0 जून रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तेराही तहसिल कार्यालयात मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठरविण्यात आली होती. सकाळी १0 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांचा शुकशुकाट दिसून आला. परंतु त्यानंतर शिक्षकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. उपरोक्त पाचही जिल्ह्यात जवळपास ४४ हजार मतदार होते. तर एकट्या बुलडाणा तालुक्यात १ हजार १४ शिक्षक मतदार होते. त्यापैकी ८२२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये ७0३ पुरूष व ११९ महिला शिक्षकांचा समावेश आहे. त्याची टक्केवारी ७५.८३ टक्के आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात ७१.0४ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदाना दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मेहकर तालुक्यात ८९३ शिक्षक मतदारांपैकी ६२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ५७५ पुरुष व ४६ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले असून, मेहकर तालुक्यात ६९.५४ टक्के मतदान झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यात ४५९ शिक्षक मतदारांपैकी ३२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३१२ पुरुष व १७ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले असून, सिंदखेडराजा तालुक्यात ७१.६७ टक्के मतदान झाले आहे. संग्रामपूरात तालुक्यात ६८.४६ टक्के मतदान झाले. २६0 मतदारांपैकी १७८ जणांनी मतदान केले. यामध्ये पुरुष शिक्षक १६३ व महिला १५ यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी फोटो आयडीसाठी थोडीफार अडचण झाली होती. खामगाव येथील केंद्रावर ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुक्यात ५९.१५ टक्के मतदान झाले. शेगाव येथील तहसिल कार्यालयात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ६८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जळगाव जामोद तालुक्यातील ३६0 पैकी २७७ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मोताळा तालुक्यात ७४.८६ टक्के मतदान झाले तर लोणार तालुक्यात ७२.६३ टक्के मतदान झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ७१.0४ टक्के मतदान
By admin | Updated: June 21, 2014 00:32 IST