वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील करंजी गरड ग्रामपंचायतच्या सरपंच गोदावरी दाजीबा पवार व त्यांचे पती दाजिबा किसन पवार यांना एक हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. ४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. करंजी गरड येथील अल्पभूधारक शेतकर्याला शासनाच्या रोजगार हमी योजनेतील मंजूर विहीरीच्या बांधकामाचे सात हजार रुपयाचे देयक मंजूर झाले होते. या देयकावर सही करण्यासाठी सरपंच व त्यांच्या पतीने सदर शेतकर्याकडे एक हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी सदर शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३0 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गुरुवारी सरपंचासह तिच्या पतीला पकडले. पुढील कारवाई सुरु असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
लाचखोर महिला सरपंच पतीसह जाळ्य़ात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:43 IST