लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ६५ वर्षीय महिलेला लाच मागणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. सुहाश मारोती ढोके (५३) रा. अन्वी मिर्झापूर असे अटक केलेल्या एजंटचे नाव असून, उत्पन्नाचा दाखला तसेच इतर कामांसाठी त्याने महिलेला तीन हजारांची लाच मागितली होती.अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी सुहाश ढोके याने सर्वोपचार रुग्णालयात स्वत:चा प्रभाव पाडून ६५ वर्षीय महिलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला व इतर कामांसाठी त्याने महिलेला तीन हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात सापळा रचला. यावेळी सुहाश मारोती ढोके याला महिलेकडून दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी एसीबीने कॅश व्हॉल्युव तपासण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी शरद मेमाणे, अनवर खान, संतोष दहीहांडे, अभय बाविस्कर, नीलेश शेगोकार, इमरान अली आदींनी केली.