बोरगाव मंजू : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. दरम्यान, १७ जागांसाठी सहा प्रभागांतून ६७ उमेदवार रिंगणात होते. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका गटातील सदस्य अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत. बोरगाव मंजू येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी महिला राखीव निघाले. त्यामुळे महिला सदस्यांपैकी कोणाच्या घरात सरपंच पद येते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होत असल्याने अखेर बोरगाव मंजू ग्रामपंचायतवर पुन्हा महिलाराज येणार आहे. निवडणुकीत गावपातळीवरील अपक्षांसह चार पॅनलच्या माध्यमातून सहा प्रभागांतून ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रभाग क्रमांक ५ मधून गुरुप्रसाद अशोक तायडे या अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. एकता पॅनलने सहा प्रभागांतून एकूण आठ जागांवर विजय मिळविला. इतर तीन सदस्यांनी एकता पॅनलशी हातमिळवणी केली आहे. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून सुनील ॐकार खेडकर, ज्ञानेश्वर सहदेव वानखडे, शजरुन्निसा अफरोज शहा. प्रभाग क्रमांक २ मधून स्वाती श्याम राऊत, कविता विजय देशमुख, अवधूत किसन विल्हेकर. प्रभाग क्रमांक ३ मधून भ्रष्टाचारविरोधी ग्राम विकास पॅनलचे फौजिया कौसर अ. रशीद, सिद्दिक अहमद मोहम्मद नजर. प्रभाग क्रमांक ४ मधून सदानंद सुखदेव हिरोळे, राधा राजेश राजनकर, बेबीनंदा धनराज गवई तर प्रभाग क्रमांक ५ मधून (अपक्ष) गुरुप्रसाद अशोक तायडे, सुहास वसंत सोनोने, पूजा मंगेश म्हैसने. प्रभाग ६ मधून अनिता सुनील खेळकर, समीउल्ला नसरुल्ला शहा, सुनीता प्रमोद पाटील हे सदस्य निवडून आले. एकता पॅनलचे सर्वाधिक आठ उमेदवार झाल्याने या पॅनलला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला व इतर तीन सदस्यांनी हातमिळवणी केली. या पॅनलच्या महिला सदस्यांपैकी कोणत्या महिला सदस्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. उपसरपंच पदासाठीही सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.