अकोला - रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दीपक चौकातील भंगार बाजारात उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनामध्ये जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. या युवकाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. भंगार बाजारात उभ्या असलेल्या एमएच ३७ बी ८0४ क्रमांकाच्या चारचाकी मालवाहूमध्ये शिलोडा येथील रहिवासी इमरान खान मदार खान (२५) या युवकाचा मृतदेह असल्याची माहिती रामदासपेठ व सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली. दोन्ही ठाण्यातील पोलीस घटनास्थळावर पोहोचले; मात्र घटनास्थळ रामदासपेठ ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने रामदासपेठ पोलिसांनी युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सवरेपचार रुग्णालयात दाखल केला. मृतक इमरान खान मदार खान याच्या शरीरावर जखमा असल्याने त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
जळालेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह
By admin | Updated: June 2, 2015 02:09 IST