अकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवार, १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यामुळे अकोला, बार्शीटाकळी, आकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांसह वृक्षांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.अकोला तालुक्यातील आगर परिसराला वादळी वारे व पावसाचा तडाखा बसला. आगर-उगवा मार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आगरमध्ये बुद्धविहार, महात्मा फुले शाळा यासह अनेकांच्या घरावरची टीनपत्रे उडून गेली. वादळी वार्यांमुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याशिवाय निंभोरा, सांगवी खुर्द, हिंगणा, कासली, गांधीग्राम, गोपाळखेड या गावांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. सांगवी खुर्द येथील २० घरांची पडझड झाली. निंभोरा येथील रघुनाथ ताथोड यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांचे घर जमीनदोस्त झाले. बाळापूर तालुक्यातील हातरूण परिसरातही सायंकाळी वादळी वार्यांनी कहर केला. येथील विद्युत रोहित्र व विद्युत खांब कोसळले. अनेकांच्या घरांची पडझड झाली. बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द, वडगाव, पिंजर, खेर्डा भागाई परिसरात वादळी वार्यासह पावसाचा तडाखा बसला. येथील दोन शेतकर्यांच्या शेतातील लिंबूची झाडे उन्मळून पडली. पातूर शहर व परिसरालाही सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. आकोट शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली
अनेक ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा
By admin | Updated: June 3, 2014 01:55 IST