राजरत्न सिरसाट/ अकोला
सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील भारिप-बहुजन महासंघाचे एकमेव आमदार बळीराम सिरस्कार यांच्याशी भाजपने संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. सिरस्कार यांनी मात्र भाजपसोबत जाण्याबाबतचा संपूर्ण निर्णय पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, कोणत्याही एका पक्षाला सत्तास्थापनेसाठी १४५ चा जादुई आकडा गाठता आला नाही. राज्यात सर्वाधिक १२३ जागा भाजपच्या असल्या तरी, एकेकाळचा मित्र पक्ष शिवसेनेशी त्यांचा दुरावा अद्यापही कायम आहे. भाजपला बहुमतासाठी २२ आमदारांची गरज आहे. त्यापृष्ठभूमीवर भाजपने अपक्ष आमदारांसह, काही प्रादेशिक पक्षांच्या आमदारांनाही गळ घालणे सुरू केल्याचे वृत्त आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्हयातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भारिप-बहुजन महासंघाचे एकमेव आमदार बळीराम सिरस्कार यांच्याशीही भाजपने संपर्क साधल्याची चर्चा जिल्हयात सुरू आहे. त्या पृष्ठभूमीवर आमदार सिरस्कार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले; मात्र पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.