रस्त्यांवर वाहने; वाहतूक विस्कळीत
अकाेला : पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या दाेन्ही कार्यालयांत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत असते. पंचायत समिती ते मनपाच्या अग्निशमन विभाग कार्यालयापर्यंत रस्त्यावर दाेन्ही बाजूने दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे गुरुवारी दिसून आले. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
गुटख्याची खुलेआम विक्री
अकाेला : शहरातील पानटपरी व गल्लीबाेळातील दुकानांमधून गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात असल्याची बाब गुरुवारी दिसून आली. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विक्री हाेत असताना अन्न व औषधी प्रशासन तसेच पाेलीस प्रशासनाकडून डाेळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे महाविद्यालय व्यवस्थापनासह पाेलीस प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
सिग्नल व्यवस्था उभारा!
अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैकात सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे. या चाैकातून पातूर, खामगाव, मेहकर आदी गावांना जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे चाैकात जड वाहनांसह प्रवासी वाहतुकीची माेठी वर्दळ राहते. या ठिकाणी तातडीने सिग्नल व्यवस्था उभारण्याची मागणी गुरुवारी निवेदनाद्वारे वाहतूक शाखेकडे करण्यात आली.
पाेलीस ठाण्यासमाेर नाला तुंबला
अकाेला : मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे अकाेटफैल पाेलीस ठाण्यासमाेर चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाई करण्याची गरज असून यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
अकाेला : पश्चिम झाेनलगत शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकापर्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम करण्यात आले. या वेळी श्रीवास्तव चाैकाच्या बाजूला खाेदण्यात आलेला खड्डा जैसे थे असल्यामुळे दुचाकीचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे.
आराेग्य निरीक्षक सुस्तावले
अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात हाेणाऱ्या साफसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे. आराेग्य निरीक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पथदिवे सुरू करा!
अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून, ही समस्या दूर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
सांडपाणी तुंबले; नागरिक त्रस्त
अकाेला : प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या गंगा नगर व कायनात परिसरात नाल्यांची साफसफाई हाेत नसल्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यांवर साचले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, प्रभागातील नगरसेवक फिरकूनही पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.
अकाेलेकरांची नियमांकडे पाठ
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
अतिक्रमणधारकांना हुसकावले
अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांलगत अतिक्रमण थाटल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला असून अतिक्रमण हटाव माेहीम राबवली जात आहे. यादरम्यान, गुरुवारी गांधी चाैक, काला चबुतरा परिसरात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांना हुसकावण्याची कारवाई करण्यात आली. पुन्हा दुकाने थाटल्यास साहित्य जप्त करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.