अकोला: महानगर पालिकेच्यावतीने आता शहरातील मोठे हॉटेल्स, खाणावळी व अपार्टमेंटला बायोगस प्रकल्प अनिवार्य करण्यात येणार आहे. लवकरच मनपाच्यावतीने शहरातील हॉटेल्सला नोटीस पाठविण्यात येणार आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतसा गॅसचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे. गॅसचा वापर वाढल्यामुळे तुटवडाही भासत आहे. शासनाला एका सिलिंडरवर ग्राहकाला मोठी सबसिडी द्यावी लागते. त्यामुळे देशाचेही आर्थिक नुकसान होते. नुकसान टाळणे व पर्यावरणाचे संवर्धन करण्याकरिता बायोगॅस निर्मितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलणे सुरू केले आहे. घरामध्ये असलेल्या ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येते. दैनंदिन उपयोगातून निर्माण होणारा कचरा नागरिक घरासमोर फेकतात. या कचर्याची नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे घाण साचते, परिणामी मच्छरांचा सुळसुळाट होतो व आजारांची लागण होते. अकोला शहरात कचर्याच्या समस्येने विराट रूप धारण केले आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ होत आहे. मनपाने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकच हॉटेल्स, खानावळी व मोठय़ा अपार्टमेंटमधील नागरिकांना बायोगॅस प्रकल्प अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिली. यासोबतच नवीन बांधकाम करणार्या अपार्टमेंटलाही बांधकामाची परवानगीच्या वेळीच बायोगॅस सुरू करण्याचे लेखी द्यावे लागणार आहे. एखाद्या घरात लागणार्या गॅसच्या ४0 टक्के गॅस बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या मासिक खर्चात बचत होऊ शकते. त्यामुळे बायोगॅसची निर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महानगरपालिकेत बायोगॅस कशाप्रकारे बनवायचा, याची नुकतीच कार्यशाळा पार पडली. यावेळी बायोगॅस बनविण्याबाबत प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
शहरातील हॉटेल्स, खाणावळींना बायोगॅस अनिवार्य!
By admin | Updated: May 5, 2015 01:25 IST