आकोट: तालुक्यातील बळेगाव येथे ग्रामसभा सुरू असताना काही लोकांनी महिला सरपंच व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.बळेगाव येथे गुरुवारी सकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच वंदना अरविंद लांडे, सचिव विनायक वायाळ व सदस्यांसह गावकरी उपस्थित होते. यावेळी गावातील एका भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर ठराव घेण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. अचानक बजरंग पोटे, अजू रहाटे, नरेंद्र रहाटे यांनी ग्रामसभेचे रजिष्टर हिसकावून घेत ही सभा कोरमअभावी अवैध असल्याचे सांगून वाद घातला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. उपरोक्त तिघांनी सरपंच पती अरविंद लांडे यांना मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करावयास गेलेल्या सरपंच वंदना लांडे यांनाही तिघांनी मारहाण केली. याबाबत आकोट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बळेगावात महिला सरपंचास मारहाण
By admin | Updated: May 3, 2014 19:10 IST