अकोला : मोरझाडी शिवारात विष प्राशन केलेल्या पाच जणांपैकी आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ बुधवारी सकाळी आधार ऊर्फ सुरज मोरखडे (१८) याचाही सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आधार व त्याची बहीण प्रीतीला मंगळवारी दुपारीच सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. सर्वोपचार रुग्णालयात दाखल होताच, अनिल मोरखडे, आता त्यांचा मुलगा आधारनेही मृत्यूला जवळ केले. बाळापूर तालुक्यातील मोरझाडी येथील अनिल बाबाराव मोरखडे (५७), रेखा अनिल मोरखडे (४५), धीरज अनिल मोरखडे (२0), आधार ऊर्फ सुरज अनिल मोरखडे (१८) आणि प्रीती अनिल मोरखडे (१५) यांनी १ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या शेतात जाऊन रोगर नामक कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या पाचही जणांना सुरुवातीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. नंतर लगेचच त्यांना खासगी रुग्णालयात हलविले होते. पाच जणांपैकी रेखा मोरखडे यांचा २ जानेवारी आणि अनिल मोरखडे यांचा ४ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचाराचा खर्च झेपत नसल्याने नातेवाईकांनी सोमवारी अनिल मोरखडे, धीरज मोरखडे यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले होते. अनिल मोरखडे यांचा सोमवारीच मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांची मुले प्रीती व आधार यांनाही खासगी रुग्णालयातून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान आधारचा मृत्यू झाला. आधारच्या पार्थिवावर मोरझाडी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या रुग्णालयामध्ये मोठा मुलगा धीरज व धाकटी प्रीती यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
आई-वडिलांपाठोपाठ आधारनेही कवटाळले मृत्यूला
By admin | Updated: January 8, 2015 00:45 IST