मूर्तिजापूर (अकोला) : भोवळ येऊन पडलेल्या एका शिक्षकास रूग्णालयात भरती करून, त्याचे १ लाख २५ हजार रुपये परत करून ऑटोरिक्षा चालकाने प्रामाणिकपणाचा परिचय करून दिला. या प्रामाणिक ऑटोचालकाचा पोलिसांनी मंगळवारी गौरव केला. मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू शाळेतील शिक्षक शेख मुस्ताक शेख हसन (रा. रोशनपुरा) हे मंगळवारी दुपारी आरडीचे १ लाख २५ हजार रुपये घेऊन सायकलने घरी जात होते. अचानक भोवळ आल्याने ते उपजिल्हा रुग्णालयासमोर कोळसले. त्यांच्या बॅगमधील रक्कम घेऊन एक मुलगा पळण्याच्या तयारीत असल्याचे ऑटोरिक्षा चालक लियाकतउल्ला खान यांना दिसले. त्यांनी तातडीने सव्वालाख रुपये स्वत:च्या ताब्यात घेऊन शेख मुस्ताक यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने सव्वालाख रुपये पोलीस स्टेशनला जमा केले. पोलिसांनी ही रक्कम शेख मुस्ताक यांचे नातेवाईक अजीज अहेमद कुरेशी यांच्या सुपूर्द केली. लियाकत खान यांचा पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी सत्कार करून त्यांना बक्षीसही दिले.
ऑटोरिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; शिक्षकाचे सव्वालाख रूपये केले परत
By admin | Updated: March 19, 2015 01:52 IST