अकोला: बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून चार गुंडांनी बांधकामावरील इंजिनिअरला फावड्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना २६ मे रोजी १.४५ वाजताच्या सुमारास न्यू तापडियानगरातील श्री विनायक सहनिवास अपार्टमेंटजवळ घडली. शुक्रवारी रात्री १२. १0 वाजता सिव्हिल लाइन पोलिसांनी चार गुंडांविरूद्ध खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. खंडणीबहाद्दरांच्या धमक्यांमुळे न्यू तापडियानगरातील नागरिक व बांधकाम व्यवसायी त्रस्त झाले असून, पोलीसही या गुंडांच्या मुसक्या आवळत नसल्याचा आरोप होत आहे. जठारपेठेतील प्रसाद कॉलनीत राहणारे सुहास सुधाकर नाईक (४८) यांनी शुक्रवारी उशिरा रात्री दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हेगारी प्रवृत्तीचा गोपाल कदम, विनोद ठोंबर व त्याचे दोन सहकारी २६ मे रोजी दुपारी त्यांच्या मधुमालती लेआऊटमधील श्री विनायक सहनिवास अपार्टमेंटजवळील त्यांच्या बांधकाम साईटवर आले. याठिकाणी त्यांचे इंजिनिअर विकास विष्णू मंडलिक हे हजर होते. चौघाही आरोपींनी त्यांच्याकडे जाऊन तुमचा मालक कुठे आहे, असे विचारून मंडलिक यांना अश्लील शिवीगाळ केली आणि खंडणी मागण्याच्या उद्देशाने धमकी दिली व बांधकामावरील फावडे घेऊन त्यांना मारहाण केली. यात मंडलिक हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुहास नाईक यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी चौघाही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0७, ३८७ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.
खंडणीसाठी इंजिनिअरवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: May 30, 2015 02:10 IST