अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा) : चिवू ये, दाणा खा, पाणी पी आणि भूर्र्र उडून जा या ओळी पुढील पिढीच्या कानावर पडाव्यात, यासाठी शहरातील एका शिक्षकाने जनजागृतीच नव्हे तर चिमणींना घर मिळवून देण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सन २00७ पासून चिमणी जगविण्यासाठी या शिक्षकाची धडपड असून गेल्या सात वर्षांंच्या कालावधीत या शिक्षकाने हजारो चिमणींना हक्काचा निवारा मिळवून दिला आहे.वाढत्या उन्हामुळे जंगल ओस पडते. जलसाठय़ासोबतच अन्नद्रव्ये मिळत नसल्याने पक्षी स्थलांतर करतात. सुरक्षीत ठिकाणी आसरा घेण्यासाठी पक्षांची चढाओढ असते. अशातच काही पक्षी प्रिय नागरिक उन्हाळ्याच्या दिवसात घर तसेच आसपास असलेल्या झाडावर कुंडीत, प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवतात; मात्र खामगाव येथील कला शिक्षकाने अतिशय कल्पकतेने पक्ष्यांना आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि विद्यार्थ्यांंच्या सहाय्याने तब्बल तीन हजाराच्यावर घरकुलं टाकाऊ वस्तुंपासून तयार केली आहेत. घरकुलं केवळ खामगाव शहरातच नव्हे तर, अकोला, बुलडाणा, नागपूर, कारंजा, यवतमाळ आदी ठिकाणीही कलाशिक्षक संजय गुरव आपल्या नातेवाइकांच्या मदतीने उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांंकडूनही गुरव यांनी एका कार्यशाळेच्या माध्यमातून घरकुल तयार करून घेतली आहेत. ही घरकुलं घराशेजारी असलेल्या झाडांवर, घराच्या आवारात, भिंतीवर तसेच मोकळ्या जागेत बसविण्यात येत आहेत. चिमणीच नव्हे तर इतर पक्ष्यांसाठी असलेल्या या घरकुलांमध्ये मैना, पोपट आणि इतर पक्षी आनंदाने राहत असल्याचे चित्र आहे.
चिमणी जगविण्यासाठी कला शिक्षकाची धडपड!
By admin | Updated: March 20, 2015 00:56 IST