अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला शहरातील जिल्हा सैनिक कल्याण विभागांतर्गत मुलामुलींचे वसतिगृह येथे आणखी एक कोविड केअर सेंटर रविवारपासून सुरू करण्यात आले आहे.
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये प्रशासनामार्फत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला शहरातील सिव्हील लाइन्सस्थित जिल्हा सैनिक कल्याण विभागांतर्गत मुलामुलींचे वसतिगृह येथे ९० खाटांचे कोविड केअर सेंटर २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आले, असे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार यांनी सांगितले.
‘पीकेव्ही’मध्ये आज
सुरू होणार सेंटर!
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) परिसरातील वसतिगृहात सोमवार, १ मार्च रोजी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार यांनी दिली.