अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणामध्ये रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास आणखी एका युवकाला ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी अटक करून न्यायाधीश ए.एम.ए. हुसैन यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ११ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर सहा ते सात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये रामटेके गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी ११ जुलै रोजी शेख मोहसिन, सागर सरोदे आणि १२ जुलै रोजी आकोट येथून संतोष उर्फ भद्दय़ा वानखडे, सोनू जाधव यांना अटक केली. हे चारही आरोपी २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. चौघांचीही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत कसून चौकशी करण्यात येत आहे; परंतु या चौकशीमध्ये एकही आरोपी बोलायला तयार नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी मिळवलेल्या सीसी कॅमेर्यांमधील चित्रणानुसार यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास पोलिसांनी अजय रूपेशसिंह ठाकूर (२0 रा. केडिया प्लॉट) याला ताब्यात घेतले. हल्ला प्रकरणामध्ये त्याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आणखी एक आरोपी गजाआड; मंगळवारपर्यंत कोठडी
By admin | Updated: July 19, 2014 01:32 IST