अकोला: महापालिकेच्या स्थायी समितीने सुचवलेल्या दुरुस्त्या लक्षात घेत महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रशासनाने प्रस्तावित केलेला ११ कोटी ६५ लाखांच्या शिलकीसह ३५३ कोटी ५३ लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. नगरसेवकांसाठी तरतूद केलेल्या १0 लाख रुपयांच्या निधीवर विरोधी पक्ष काँग्रेसने गदारोळ सुरू केल्याचे पाहून महापौरांनी अवघ्या अडीच तासात अर्थसंकल्पीय सभा गुंडाळली.आर्थिक वर्ष उलटून गेल्यानंतर सोमवारी मनपाच्या मुख्य सभागृहात अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाने सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात १८ मार्च रोजी स्थायी समितीने सुधारणा करीत दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या दुरुस्त्या ध्यानात घेऊन अर्थसंकल्पीय सभेत सविस्तर चर्चा होणे सर्वपक्षीय नगरसेवकांना अपेक्षित होते. सभेला सुरुवात होताच, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या मनपाच्या उत्पन्न वाढीसह खर्चाची इत्थंभूत माहिती सभागृहाला दिली. माजी महापौर तथा काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक मदन भरगड यांनी स्थायी समितीने तयार केलेल्या अंदाजपत्रकाचे कौतुक करीत निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते; परंतु अवघ्या १५ दिवसांत प्रशासनाला विकास काम सांगितल्यास आर्थिक तरतूद संपुष्टात आल्याचे सांगून प्रशासन हात वर करीत असल्याचे भरगड यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदी १५-१५ दिवसांत संपत असतील तर कागदोपत्री ही तरतूद वर्षभरासाठी कशी, असा सवाल भरगड यांनी उपस्थित केला. प्रशासन जर मनपा निधीची कामे ठप्प ठेवत असेल तर अकोलेकरांनी कर का जमा करावा, हा मुद्दा त्यांनी सभेत लावून धरला. विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी तरतूद केलेल्या १0 लाखाच्या निधीवर प्रशासनासह सत्ताधार्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरसेवकांना विकास कामांसाठी तरतूद केलेले १0 लाख रुपये त्यांना कधी मिळतील, याची शाश्वती काय, असे प्रश्न उपस्थित करीत साजिद खान यांनी अखेरपर्यंत माईकचा ताबा सोडला नाही. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी चार टप्प्यांत १0 लाखांच्या निधीचे वाटप केले जाणार असल्याचे सांगत अत्यावश्यक कामांसाठी हा निधी नगरसेवकांच्या उपयोगी पडणार असल्याचे मत मांडले. आयुक्तांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या विरोधी पक्षनेत्यांसह मदन भरगड यांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, महापौर उज्ज्वला देशमुख आणि साजिद खान यांच्यात बाचाबाची सुरू होताच, महापौरांनी सभा संपल्याचे घोषित केले.
११ कोटींच्या शिलकीसह ३५३ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
By admin | Updated: April 19, 2016 02:31 IST