अकोला : अकोला जीआरपीचे ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे आणि गुन्हे शाखेच्या चार लाचखोर पोलीस कर्मचार्यांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पाचही आरोपींना ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या पाचही आरोपींना शुक्रवारी रात्री साडेसहा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. रेल्वे स्टेशन परिसरात तसेच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणार्या फेरीवाल्यास खाद्यपदार्थांची विक्री करावयाची असेल तर दर महिन्याला साडेसहा हजार रुपयांचा ह्यहप्ताह्ण आणि कारवाई टाळण्यासाठी अकोला जीआरपीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे, जीआरपी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गौतम हरिभाऊ शिरसाट, शरद बाळाभाऊ जुनघरे, सतीश जसवंतसिंह चव्हाण आणि सुनील लक्ष्मण कडू या पाच लाचखोरांनी फेरीवाल्यास साडेसहा हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी दिवसभर फेरीवाल्याकडे तगादा लावून रक्कम देण्यास त्याला परेशान केले. त्यानंतर शुक्रवारीही जीआरपीच्या पोलीस अधिकार्यासह कर्मचार्यांचा हा प्रताप सुरूच असल्याने फेरीवाल्याने या प्रकाराची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख उत्तम जाधव यांनी शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखडे, गौतम शिरसाट, शरद जुनघरे, सतीश चव्हाण आणि सुनील कडू या पाच पोलिसांना अटक केली. त्यानंतर पाचही आरोपींना न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे
ठाणेदारासह पाचही पोलिसांच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: August 2, 2016 01:50 IST