हिवरखेड मार्गावरील फिजा धाब्यावर काम करणाऱ्या आदिवासी बालकाला चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ५ डिसेंबर २०१८ रोजी घडली होती. वैद्यकीय अहवाल व घटनास्थळावरील प्रथमदर्शनी पुरावे लक्षात घेता तत्कालीन अकोट ग्रामीणचे ठाणेदार मिलिंदकुमार बहाकार यांनी, याप्रकरणी आरोपी फिरोज खान अकबर खान, सलीम खान अकबर खान, रा.इंदिरा नगर अकोट यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. आदिवासी बालकाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आदिवासी संघटना व राजकीय पक्षांनी लढा सुरु केला होता. दरम्यान तपासात या घटनेतील गुन्ह्यात कलम वाढल्याने हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. या हत्याकांडात इमरान खान अकबर खान,अकबर खान जब्बार खान यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष म्हणजे हत्याकांडातील साक्षीदारांचे न्यायालयाने जबाब नोंदविले होते. सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या साक्ष सरकार पक्षातर्फे नोंदविण्यात आल्या. परंतु यातील साक्षीदार न्यायालयाला फितूर झाले. आरोपी पक्षाचे विधिज्ज्ञ व सरकारी विधिज्ज्ञांनी युक्तिवाद केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कार यांनी सबळ पुराव्याअभावी चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी विधिज्ज्ञ अजित देशमुख यांनी, आरोपींकडून ॲड. मोहन मोयल, ॲड. दिलदार खान, ॲड. अंजुम काझी, ॲड. मनोज वर्मा यांनी बाजू मांडली.
सहा साक्षीदार झाले फितूर!
बहुचर्चित फिजा धाब्यावरील सात वर्षीय आदिवासी बालकाच्या खून खटल्यातील सर्व आरोपींना वाचविण्यासाठी सहा साक्षीदारांनी जाणीवपूर्वक खोटी साक्ष दिली. साक्षीदारांनी खोटी साक्ष देऊन गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी केली होती.