नितीन गव्हाळे / अकोलादेशी व विदेशी दारू विक्री बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियम घालून दिले आहेत. परंतु, दारू विक्रेते सर्रास नियमांचे उल्लंघन करीत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या वेळेनुसार देशी व विदेशी दारू विक्रेत्यांनी दुकाने, वाइनबार उघडावी, असा नियम आहे. परंतु, या नियमाचे शहरातील एकही दारू विक्रेता, वाइनबार चालक पालन करीत नसल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला. नियम धाब्यावर बसवून दारू विक्रेते निर्धारित वेळेपूर्वीच दुकाने व वाईनबार उघडत असल्याची गंभीर बाब समोर आली. गुरूवारी सकाळी ८.३0 ते ९.३0 वाजताच्या सुमारास लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान देशी व विदेशी दारूची दुकाने निर्धारित वेळच्या अगोदरच उघडल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार देशी दारूची दुकाने सकाळी १0 वाजता, वाईन शॉप सकाळी ९ वाजता, बियर शॉप सकाळी ९ वाजता आणि वाईनबार सकाळी १0.३0 उघडावी लागतात. परंतू या नियमांकडे जाणीवपुर्वक दरुलक्ष करून दारू विक्रेते, वाईनबार चालक सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास दारू विक्रीची दुकाने व बार उघडून कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. निर्धारित वेळेपूर्वी दारूची दुकाने उघडण्याचा प्रकार एका दिवसापासून नव्हेतर अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही या दारू विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नियमांचा भंग करीत असल्यानंतरही राज्य उत्पादन शुल्क विभाग दारू विक्रेत्यांच्या कृतीकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत आहेत. दारू विक्रेत्यांनी सारे नियम बाटलीत बुडवून ठेवल्याने नियम कोणासाठी आणि कशासाठी आहेत. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दारू पोटात, नियम बाटलीत..
By admin | Updated: November 14, 2014 00:51 IST