लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्या जलवाहिन्यांची ‘टेस्टिंग’ घेतली जात असली, तरी संबंधित कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा व मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र केशव नगरासह अनेक ठिकाणी दिसून येत आहे. महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, शहरावर जलसंकटाचे सावट असल्याची जाणीव असतानासुद्धा प्रशासकीय यंत्रणेसोबतच अकोलेकरदेखील पाण्याच्या नासाडीबाबत कमालीचे बेपर्वा असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे नवीन जाळे, जलकुंभ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सदर कामाचा कंत्राट ‘एपी अँण्ड जीपी’ कंपनीकडे असून, कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली आहे. योजनेच्या एकूण किमतीच्या बदल्यात एमजेपीला तीन टक्के रक्कम अदा केली जाणार आहे. शासनाने एमजेपीवर जबाबदारी निश्चित केली असली, तरी प्रत्यक्षात जलवाहिन्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय, जुन्या जलवाहिन्यांच्या बाजूला नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर नागरिकांना दिल्या जाणार्या कनेक्शनमधून दाबाने पाणी पुरवठा होतो किंवा नाही, याची चाचपणी घेतली जात असताना पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत आहे. ऐन उन्हाळ्य़ाच्या दिवसांत पाण्याचे धो-धो लोट वाहत असल्यामुळे या नासाडीला जबाबदार कोण, या प्रकाराला महापालिका प्रशासन आळा घालेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नासाडीची काळजी का नाही?निसर्गनिर्मित असणारे पाणी कृत्रिमपणे तयार करण्याचा अद्यापही शोध लागला नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी नागरिकांना किमान दोनशे ते चारशे फूट खोलपर्यंत बोअर खोदाव्या लागत आहेत. नवीन जलवाहिनीचे कनेक्शन उघडे असले तरी त्याला तोटी लावता येणे सहज शक्य आहे. प्रशासनाला दोष देण्यापेक्षा अकोलेकरांनाही पाण्याच्या नासाडीची काळजी नसावी, याबद्दल खेद व्यक्त केला जात आहे.
दक्षिण झोनसह पूर्व झोनमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते किंवा नाही, यासाठी ‘टेस्टिंग’ घेतली जात आहे. त्यामध्ये बहुतांश वेळा टॅँकरद्वारे पाण्याचा उपयोग केला जातो. तरीही उन्हाळ्य़ाचे दिवस लक्षात घेता पाण्याच्या नासाडीला आवर घालण्याची दक्षता घेतली जाईल. -सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग मनपा-