अकोला: कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या आंतरवासिता डॉक्टरांनी ऑक्टोबर महिन्यात कोविड भत्त्यासाठी कामबंद आंदोलन केले होते. पंधरा दिवसांत कोविड भत्ता दिला जाणार असल्याचे आश्वासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आले. या आश्वासनाला महिना झाला, तरी त्यांना कोविड भत्ता न मिळाल्याने निराशेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टरांना सुरुवातीपासून कोविड भत्ता लागू करण्यात आला होता; मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांना अद्यापही कोविड भत्ता लागू करण्यात आला नाही. विद्यावेतनही नियमित मिळत नसल्याने आंतरवासिता डॉक्टरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत असताना रुग्णालय प्रशासनाने आंतरवासिता डॉक्टरांना कोविड भत्ता लागू करावा, यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले; मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने सर्वोपचार रुग्णालयातील १२० आंतरवासिता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गत चार दिवसांपासून कोरोना वॉर्डातील बहुतांश भार परिचारिकांवर आला होता. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आंतरवासिता डॉक्टरांना नोटीस बजावत २४ तासात रुजू व्हा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्याबाबत रुग्णालय प्रशासनातर्फे आंतरवासिता डॉक्टरांना १५ दिवसांत कोविड भत्ता लागू करण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून आंतरवासिता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात सेवा देण्यास सुरुवात केली; मात्र आश्वासनानुसार, अद्यापही आंतरवासिता डॉक्टरांना कोविड भत्ता लागू झाला नाही. त्यामुळे आंतरवासिता डॉक्टरांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
Akola GMC : आंतरवासिता डॉक्टरांना कोविड भत्त्याची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 11:19 IST
Akola GMC: Intern doctors, Covid allowance सर्वोपचार रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांना अद्यापही कोविड भत्ता लागू करण्यात आला नाही.
Akola GMC : आंतरवासिता डॉक्टरांना कोविड भत्त्याची प्रतीक्षा!
ठळक मुद्देआश्वासनाला महिना झाला, तरी नाही मिळाला निधी. विद्यावेतनही नियमित मिळत नसल्यानेनाराजीचे वातावरण पसरले आहे.