अकोला: जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, शेतकर्यांना दुष्काळी मदत देण्यात यावी आणि शेतकर्यांचे पीक कर्ज संपूर्ण माफ करण्यात यावे, या मागण्यांसाठी शिवसेना अकोला जिल्हय़ाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामसमोर धरणे देण्यात आले. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात नापिकीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील केवळ ५५ गावांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी करण्यात आली असून , उर्वरित इतर ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा जाहीर करण्यात आल्याने, शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत जिल्ह्यातील ५५ गावेच दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सुधारित व अंतिम पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सर्व ९९७ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असली, तरी शासनामार्फत अद्यापही अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला नाही व दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दुष्काळी मदत जाहीर करण्यात आली नाही. सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, पुढील हंगामात शेतीच्या मशागतीसाठी बी-बियाण्यांसाठी पैसे कोठून आणणार, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतकर्यांना दुष्काळी अनुदान देण्यात यावे, शेतकर्यांचे पीक कर्ज संपूर्ण माफ करण्यात यावे, पुढील हंगामासाठी शासनाकडून शेतकर्यांना मोफत बियाणे देण्यात यावे, खते अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे, पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना करण्यात याव्या, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या, शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीपंपांची वीज जोडणी कापण्यात येऊ नये,शेतमजुरांसाठी रोहयो अंतर्गत तातडीने कामे सुरू करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी शिवसेना अकोला जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतक-यांना मदत द्या!
By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST