अकोला : प्रकल्पग्रस्तांच्या थकीत तीन लाख रुपयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी जप्तीची नामुष्की ओढवली होती. अखेर थकीत रकमेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ही नामुष्की टळली. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत मूर्तिजापूर तालुक्यात पेन येथे गावतलावाचे काम करण्यात आले. या प्रकल्पात ज्यांची जमीन गेली, त्यांना वेळेत मोबदला मिळाला नाही. अशाच प्रकल्पग्रस्तांपैकी अताउल्लाखाँ आणि फातिम अली यांनी दोन वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेतली होती. शासनाकडून त्यांना ३ लाख ३६ हजार ८९५ रुपये घेणे आहे. या रकमेच्या बदल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार प्रकल्पग्रस्त मंगळवारी बेलीफसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जप्ती आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. अखेर या प्रकरणात रक्कम उपलब्ध करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना जिल्हाधिकार्यांनी दिल्यानंतर जप्तीची नामुष्की टळली.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर तीन लाखांसाठी जप्ती!
By admin | Updated: November 12, 2014 01:08 IST