अकोला - विदर्भात शिवसेनेचे पाळेमुळे मजबूत करण्यासाठी नव्या दमाच्या पदाधिकार्यांकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १0 एप्रिलनंतर विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. अकोला जिल्हाप्रमुखांच्या स्पर्धेसाठी चुरस निर्माण झाली असून, माजी महापौरांसह तिघांनी मुंबई येथे मुलाखत दिली असल्याची माहिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सर्व जिल्ह्यात शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रथम संपर्कप्रमुखांची नव्याने निवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात खासदार अरविंद सावंत यांच्याकडे संपर्कप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता जिल्हाप्रमुख पदासाठी नवे शिलेदार शोधण्याचे काम सुरू आहे. अकोला जिल्हातून या पदासाठी चांगलीच चुरस आहे. मुंबईत वजन असलेल्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्तीला या पदावर बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातून तिघांचे नावे या पदासाठी पुढे आले असून, या तिघांनाही उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले होते. २६ मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत या तिघांसोबत जिल्हाप्रमुख पदासाठी चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्वच जिल्ह्यातून प्रत्येकी तीन दावेदारांना या बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी महापौर सुरेश पाटील आणि गोपाल दातकर यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. या तिघांपैकी एकाच्या गळ्य़ात जिल्हाप्रमुख पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेत अकोला जिल्हाप्रमुख पदासाठी चुरस
By admin | Updated: April 7, 2015 02:02 IST