अकोला : मनसेचे जिल्हा प्रमुख आता मुंबईतील टिळक भवनाच्या उंबरठय़ावर पोहोचले असून, त्यांनी अकोला पूर्व विधानसभा या मतदारसंघासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना साद घातली आहे. यामुळे जिल्हय़ातील काँग्रेसमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्तिवरुन विजय मालोकार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र पक्षाने त्यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारलेला नाही, आणि त्यांच्या जागी अन्य कोणाची नियुक्तीही केलेली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्टया मालोकार हे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावर कायम आहेत. २00४ पासून ते निवडणूक रिंगणात उतरत आहेत. शिवसेनेत त्यांची गळचेपी केली गेली असे ते म्हणतात. त्यांच्या विरोधात सुरुवातीला त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून एल्गार पुकारला. त्यात यशस्वीही झाले. गत दोन विधानसभा निवडणुकीतील त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्ष वेधून घेणारी होती. काँग्रेसमध्ये त्यांना भवितव्य वाटत असल्याने यावेळी त्यांनी मनसे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनाम देऊन टिळक भवनाच्या प्रवेशद्वाराकडे वळले आहेत. ज्या अकोला पूर्व मतदारसंघातून त्यांनी लक्षणीय मते खेचली, त्याच मतदारसंघाची त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राच्या काँग्रेस निवडणूक प्रभारीकडे साद घातली आहे. मनसे सोडल्यानंतर मध्यंतरी ते मूळ शिवसेना या स्वगृही पक्षात परतणार असल्याची चर्चा होती; पण अचानक ते काँग्रेसकडे वळले आहेत. काँग्रेस त्यांना तिकीट देते की नाही, हा नंतरचा भाग असला तरी, त्यांच्या या राजकीय डावामुळे जिल्हय़ातील काँग्रेस आघाडी जणांमध्ये चर्चेला उधान आले आहे.शिवसेनेत पुन्हा परतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; परंतु काँग्रेसकडे मात्र मी गेलो आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो आहे. अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने तिकीट दिल्यास लढण्यास तयार आहे. - विजय मालोकार,माजी मनसे प्रमुख-अकोला जिल्हा.
मनसेचे अकोला जिल्हा प्रमुख कॉँग्रेसच्या उंबरठय़ावर!
By admin | Updated: September 4, 2014 01:28 IST