अकोला: विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यांनतर या संत्र्याच्या उत्पादन वाढीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, इंडो-इस्त्राईलच्या धरतीवर घनदाट लागवड पद्धतीचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उच्चघनता तंत्रज्ञानाला शेतकर्यांनी अनुकूलता दाखवली आहे. दरम्यान, या प्रकल्पाला पुढे रेटण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याने कृषी विद्यापीठाने १0 कोटी रुपयांचा प्रस्ताव राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (एनएचएम) कार्यालयाकडे पाठवला आहे. इंडो-इस्त्राईल प्रकल्पाच्या माध्यमातून हेक्टरी २५ टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट या विद्यापीठाने समोर ठेवले असून, या संशोधनातून संत्रा उत्पादन वाढत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. याच पृष्ठभूमीवर इस्त्राईलने नागूपर येथील संत्रा प्रकल्पाची दखल घेतली असून तसे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. विदर्भात संत्र्याचे जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र आहे; परंतु या संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टनाचे उत्पादन फार कमी शेतकरी घेतात. देश-विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्यांना दिलासादायक ठरेल. त्यामुळे या संत्र्यावर या कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. इंडो-इस्त्राईल या नावाने राबविण्यात येणार्या या प्रकल्पांतर्गत नागपूर, अमरावती येथील शेतकर्यांच्या शेतावर या प्रकल्पांतर्गत संत्रा लागवड करण्यात आली होती. त्याचे अनुकूल निष्कर्ष समोर आले असल्याचे संत्र्यावर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. विदर्भातील संत्रा फळाला नाव मिळाले असून, या फळ पिकाचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेती अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, याच उद्देशाने नागपुरी संत्र्यावर वेगवेगळे संशोधन करून उत्पादन कसे वाढविता येईल, यावर या कृषी विद्यापीठाने भर दिला असून, त्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत. विदर्भातील नागपुरी संत्र्याची देश-विदेशात मागणी आहे. म्हणूनच या संत्रा उत्पादन वाढीवर भर देण्यात आला. सुरुवातीला पथदर्शक प्रकल्पाच्या तंत्रज्ञानातून हेक्टरी २५ टन उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. आणखी संशोधन करण्यासाठी नव्याने १0 कोटी रुपयांचा प्रस्ताव एनएचएमकडे पाठवला असल्याचे कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील इंडो-इस्त्राईल संत्रा प्रकल्प समन्वयक डॉ.डी.एम. पंचभाई यांनी सांगीतले.
नागपुरी संत्र्याच्या उत्पादन वाढीकडे कृषी विद्यापिठाचे लक्ष
By admin | Updated: September 8, 2015 02:41 IST