अकोला : संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रथमच अकोल्यात येत असलेले आदित्य ठाकरे विद्यार्थी व शेतकऱ्यांसह शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. २८ आॅगस्ट रोजी मूर्तिजापूर, बोरगाव मंजू येथे त्यांचे स्वागत होणार आहे. मुख्य संवाद कार्यक्रम २९ आॅगस्ट रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. त्यानंतर वाडेगाव येथे विजय संकल्प सभा होणार असल्याची माहिती आ. बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी किमान दोन मतदारसंघ शिवसेनेला मिळावे, अशी अपेक्षा आहे. पाचही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याच्या तयारीतही पक्ष असल्याचे आमदार बाजोरिया यांनी सांगितले. भाजपसोबत युतीत शिवसेनेकडे किमान दोन मतदारसंघ असावे, त्यात एक शहरातील व एक ग्रामीण भागातील मतदारसंघ असावा, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचेही जिल्हाप्रमुख देशमुख यांनी सांगितले.यावेळी आमदार विप्लव बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, प्रा. डॉ. श्रीप्रभू चापके, महादेव गवळे, अनिल गावंडे, ज्योत्स्ना चोरे, वैशाली घोरपडे, देवश्री ठाकरे, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, विठ्ठल सरप यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
- दोन मतदारसंघांची नावे गुलदस्त्यातजिल्ह्यातील कोणत्या दोन मतदारसंघांची मागणी करण्यात आली, याची माहिती यावेळी देण्याचे त्यांनी टाळले. पक्षांतर्गत वाद टाळणे तसेच पक्ष एकसंध ठेवण्यासाठी प्रमुखांकडे मागणी केलेल्या मतदारसंघाची नावे गोपनीय ठेवणे आवश्यक असल्याचेही आमदार बाजोरिया म्हणाले.
...तर महिला उमेदवारही रिंगणातपक्षाला युतीमध्ये दोन मतदारसंघ सुटले, तर त्यातील एका मतदारसंघात महिला उमेदवार असेल, असे आमदार बाजोरिया यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने पक्षातील उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या.