अँड. नीलिमा शिंगणेअकोला : महाराष्ट्राचा स्टार बॉक्सर आदित्य मने याने तेलंगणचा राष्ट्रीय पदक विजेता बॉक्सर एस.साईचा पराभव केला. बुधवारी सायंकाळी अकोला येथील वसंत देसाई क्रीडांगण येथे नाईट फाईट बॉक्सिंग चॅम्पियनशिप अंतर्गत महाराष्ट्र टायगर्स विरुद्ध तेलंगण फायटर्समध्ये लढतीचे आयोजन केले होते. वरिष्ठ गटातील पहिली लढत ६४ किलो वजनगटात आदित्य आणि पी.साई यांच्यात झाली. लढतीच्या तिसर्या फेरीत एस.साई थकल्यामुळे पंच अक्षय टेंभुर्णीकर यांनी लढत थांबवून महाराष्ट्र टायगर्सच्या आदित्य मने याला विजयी घोषित केले.पहिल्या फेरीत आदित्यने दमदार ठोशांच्या भरवशावर एस.साईवर दबाव आणला. दुसर्या फेरीत साई आदित्यच्या प्रहारांचा प्रतिकार करू शकला नाही. ही फेरी साईने निभावून नेली; मात्र तिसर्या फेरीत त्याने थकल्यामुळे पुढे खेळू शकत नसल्याचे पंचांना सांगून, लढत थांबविण्यास सांगितली. आदित्यने तंत्रशुद्ध खेळत आपली लय कायम ठेवली होती. यामुळेच तिन्ही फेरीत त्याने वर्चस्व गाजविल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले. उर्वरित लढती रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. लढतींचे समालोचन प्रा. जमील अहमद व रेड्डी यांनी केले.अकोला येथे मागील एक वर्षापासून नाईट फाईट बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येत आहे. लंडन नाईट फाईट बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, या साखळीतील ही चौथी स्पर्धा आहे. याआधी पश्चिम महाराष्ट्रातील, चंद्रपूर-गडचिरोली आणि अकोला जिल्हा अंतर्गत स्पर्धा खेळविण्यात आली होती. या स्पर्धेची संकल्पना राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांची असून, चौथी स्पर्धादेखील यशस्वी झाली.
महाराष्ट्र टायगर्सच्या आदित्य मनेची विजयी सलामी
By admin | Updated: October 29, 2014 22:58 IST