अकोला: धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई मनपा प्रशासनाने सुरू केली असली तरी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बाजू ऐकून घ्या, त्यानंतर पुढील कारवाई करा, या मुद्दय़ावर आ. रणधीर सावरकर, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील धार्मिक स्थळे हटवण्याला प्रारंभ केला आहे. मनपा प्रशासनाकडून कारवाईचा अहवाल नियमितपणे हायकोर्टासह विभागीय आयुक्तांकडे सादर केला जात आहे. यादरम्यान प्रशासनाने २0 जानेवारी रोजी जठारपेठ चौकातील मंदिर हटवण्याची कारवाई केली. परिसरातील काही मंदिरे काढल्यानंतर या चौकातील मोठय़ा मंदिरांवरही कारवाई केली; परंतु संबंधित विश्वस्तांनी स्वत:हून मंदिर हटविण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रशासनाने कारवाई थांबवली तसेच मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्या २२२ धार्मिक स्थळांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले. या पृष्ठभूमीवर आ. रणधीर सावरकर, माजी आमदार तुकाराम बिरकड, विजय अग्रवाल यांनी आयुक्त अजय लहाने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. धार्मिक स्थळांना नोटीस जारी केल्यावर संबंधित विश्वस्तांना बाजू मांडण्याची संधी देण्यावर यावेळी चर्चा झाली.
धार्मिक स्थळांवरील कारवाई; विश्वस्तांची बाजू ऐकून घ्या!
By admin | Updated: January 22, 2016 01:33 IST