रिसोड (जि. वाशिम): लग्नाचा बस्ता व अन्य साहित्याच्या खरेदीसाठी रिसोडला येणार्या ऑटोला ट्रॅक्टरची जबर धडक बसल्याने तीन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना रिसोडजवळ रिसोड ते हिंगोली मार्गावर २६ जानेवारीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ट्रॅक्टरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शिंगी खांबा येथील शामराव लोणकर यांच्या फिर्यादीनुसार, लग्नाचा बस्ता व अन्य साहित्याची खरेदी करण्यासाठी शिंगी येथील नऊ जण एच.एच. २६ एके ५३४१ क्रमांकाच्या ऑटोने रिसोडला येत होते. रिसोडपासून दोन किमी अंतरावर एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ऑटोमध्ये समोरासमोर जबर अपघात झाला. ऑटोमध्ये नऊ जण बसले होते. या अपघातात ऑटोचालक ज्ञानू देवकर, देवेंद्र महादा लोणकर हे दोघे जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान रतनबाई देवकर यांचा मृत्यू झाला. ऑटोमधील संभाजी लोणकर, शोभा चाटसे, सुरेखा लोणकर, मोतीराम लोणकर हे जखमी झाले. ८0 वर्षीय मोतीराम लोणकर गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ हिंगोली येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. रिसोड ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ हिंगोली येथे पाठविण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने रिसोड ते हिंगोली मार्गावरील खासगी रुग्णालयांनी जखमींना दाखल केले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. शामराव लोणकर यांच्या फिर्यादीहून या प्रकरणी ट्रॅक्टर चालक रशीदखान लतीफ खान, याच्याविरुध्द भादंवी कलम ३0४ अ २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला. ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले.
अपघातऑटो- ट्रॅक्टर अपघातात तीन ठार, एक गंभीर
By admin | Updated: January 27, 2016 23:32 IST