अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारणाऱ्या अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर येथील सहायक लेखाधिकाऱ्यांची अनुपस्थिती सभेला खटकली. संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे निर्देश सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात झाल्यानंतर देखील लेखाधिकारी गीता नागर यांनी मागील सभेचे इतिवृत्त तयार न केल्याचे पाहून उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लेखाधिकारी नागर यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर अर्ध्या तासाने इतिवृत्त आणण्यात आले. सभेमध्ये २०१५-१६ व १६-१७ मधील जमा-खर्चाचा आढावा घेऊन नोंदवह्यांची मागणी केली असता नोंदवह्या अर्धवट असल्याचे समोर आले. रोकड वहीत अपूर्ण नोंदी असल्यामुळे हा विषय सभेने नामंजूर केला. तसेच रोकड वहीत नोंदी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. २०१५-१६ मधील लेख्याची माहिती घेण्यात आली. यावेळी २०१६-१७ मधील लेख्याची माहिती अपूर्ण असल्याने हा विषय स्थगित ठेवण्यात आला. १० मार्च रोजी आयेजित सभेमध्ये महिला व बाल कल्याण समितीचे अधीक्षक घुले अनुपस्थित होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जि.प. सदस्य ज्योत्स्ना बहाळे यांनी मांडला. सभेने त्याला मंजुरी दिली. सभेला जिल्हा परिषद सदस्य देवानंद गणोरकर, ज्योत्स्ना बहाळे, गीता राठोड, अक्षय लहाने व अधिकारी उपस्थित होते.
सहायक लेखाधिकारी अनुपस्थित; कारवाईचे निर्देश
By admin | Updated: May 10, 2017 07:23 IST