अकोला: गांधीग्राम येथील प्रकाश अढाऊ व त्यांचे नातेवाईक व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमध्ये हाणामारीची घटना गुरुवारी रात्रीदरम्यान घडली. वडिलांसोबत आलेल्या गर्भवती महिलेस प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मारहाण केल्यामुळे तिचा रविवारी सायंकाळी स्त्री रुग्णालयामध्ये गर्भपात झाल्याचा आरोप महिलेचा पती व तिच्या नातेवाईकांनी केला. २ एप्रिल रोजी रात्री गांधीग्राम येथील प्रकाश अढाऊ हे अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी उपचारावरून अढाऊ व त्यांच्या नातेवाईकांचा तेथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत वाद झाला. नंतर त्यांच्यात हाणामारी झाली. यात प्रकाश अढाऊ यांची गर्भवती मुलगी कल्पना संतोष भगत (२२) हिलासुद्धा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मारहाण केली होती. रविवारी दुपारी कल्पनाच्या पोटात दुखू लागल्याने तिला पती व नातेवाईकांनी स्त्री रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दुखापतीमुळे बाळ खाली आल्याचे सांगितले आणि तातडीने गर्भपात करण्याचे सुचविले. त्यानुसार कल्पनाचा रविवारी डॉक्टरांनी गर्भपात केला. हा गर्भपात वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप पती संतोष भगत व कल्पनाच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला. यासंदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली; परंतु पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मारहाणीत महिलेचा गर्भपात
By admin | Updated: April 6, 2015 02:10 IST