विवेक चांदूरकर/ अकोला जसजशी राज्याची लोकसंख्या वाढत आहे, तसतसे शहरीकरण व औद्योगिकीकरणही वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच विजेचा वापरही त्याच प्रमाणात वाढला. २00५ पासून २0१४ पर्यंत राज्यात ७८ लाखांच्यावर ग्राहक वाढले असून, या ९ वर्षात विजेचा वापर साडेचार हजार मेगावॅटने वाढला आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटीच्या जवळपास असून, शहरीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. सोबतच विभक्त कुटुंबांच्या संख्येतही वाढ होत आहे. वीज ही आधुनिक युगात जीवनावश्यक बाब बनली असून विजेच्या मागणीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात महावितरणचे २00५ साली १ कोटी ३६ लाख ५६ हजार ग्राहक होते. १ ऑक्टोबर २0१४ पर्यंत यामध्ये ७८ लाख १६ हजार ग्राहकांनी वाढ होऊन आता राज्यात २ कोटी १४ लाख ७२ हजार ग्राहक झाले आहेत. एवढय़ा ग्राहकांना सेवा पुरविणारी महावितरण ही विद्युत क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. २00५ मध्ये राज्यात १२,५00 मेगावॅट विजेचा वापर होत होता. आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्टोबर २0१४ मध्ये १७ हजार मेगावॅटच्या वर विजेची मागणी होत आहे. विजेचा वापर वाढल्यामुळे वीज निर्मितीपासून, वीज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यापर्यंत सर्वच बाबींचा विस्तार झाला आहे. राज्यात २00५ साली १ हजार ७७0 उपकेंद्र होते तर २0१४ साली त्यामध्ये ५१ टक्क्यांनी वाढ होऊन २ हजार ६८0 उपकेंद्र झाले आहेत. फिडरनिहाय भारनियमन करणारी महावितरण देशातील एकमेव कंपनी असून, ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असलेल्या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत गळतीवर अंकुश मिळविण्यात महावितरणला काही प्रमाणात यश आले आहे. ज्या प्रमाणात विजेच्या ग्राहकांमध्ये वाढ होत आहे, त्या प्रमाणात वीज निर्मितीत वाढ होत नसल्याचे वास्तव आहे. महावितरणने गत दहा वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग राबवून ग्राहकांना नियमित व अखंड वीज देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सध्या विजेची मागणी १७ हजार मेगावॅट आहे. तरीही महावितरण संपूर्ण राज्यातील ग्राहकांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करीत असल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक महावि तरण) राम दोतोंडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
९ वर्षात वाढले ७८ लाख विजेचे ग्राहक
By admin | Updated: November 15, 2014 23:45 IST