संतोष येलकर / अकोला:टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील २00 गावांमध्ये ५५ कोटी ५४ लाख ४९ हजार रुपयांची जलसंधारणाची कामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३३ हजार हेक्टरवर ढाळीच्या बांधासह विविध कामांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, जिल्ह्यात सोमवारपासून जलयुक्त शिवार अभियानातील कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वारंवार उद्भवणार्या टंचाई परिस्थितीवर मात करण्याकरिता आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने गेल्या नोव्हेंबरमध्ये घेतला. या अभियानाच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील गावांची निवड करून, प्राधान्याने करावयाच्या जलसंधारणाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये ५५ कोटी ५४ लाख ४९ हजार रुपयांची विविध जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील या कामांना २६ जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे.
२00 गावांमध्ये ५५ कोटींची कामे
By admin | Updated: January 26, 2015 01:31 IST