अकोला : इतरांना काही देण्यासाठी पात्र असलेले लोक समाजातील गोरगरिबांची नेहमीच मदत करत असतात, अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील. अम्रितविला परिवारातील नानकरोटी ट्रस्टचे कार्य वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ही ट्रस्ट ३६५ दिवस गोरगरिबांची भूक भागविण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात जवळपास ५००-५५० लोकांची जेवणाची ते व्यवस्था करीत आहे.
आपल्यापैकी सगळ्यांनाच दोन वेळचे जेवण खायला मिळत असते, पण शहरात असे अनेक लोक आहेत जे उपाशीपोटीच झोपतात. त्यांना दोन वेळचे अन्नही खायला मिळत नाही. अशा परिस्थितीत नानकरोटी ट्रस्ट ही सामाजिक संस्था गोरगरिबांना अन्नदान करून, त्यांची एक वेळ जेवणाची भ्रांत दूर करीत आहे. शहरातील २०-२५ जण मिळून गुरुप्रीत सिंघ (रिंकू वीरजी) यांच्या मार्गदर्शनात अम्रितविला परिवाराच्या अंतर्गत सामाजिक कार्याकरिता सरसावले आहे. यामुळे सामाजिक ऐक्य असलेली ही संपूर्ण टीम आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून भुकेलेल्यांची भूक भागविण्याचे काम करत असते. समाजातील गरीब, अनाथ, बेघर लोकांच्या भूक शमविण्यासाठी हे स्वयंसेवक तनामनाने काम करीत असतात. सुरुवातीला तीन-चार जणांनी मिळून सुरू केलेल्या उपक्रमात आता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग लाभत आहे. या कार्यात अनेक जण निस्वार्थपणे सेवा देत आहे.
--बॉक्स--
दररोज न चुकता पोहोचते जेवण
कडक निर्बंध असल्याने अनेकांची दोन वेळच्या जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोक आढळून येतात. या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना न चुकता एक वेळचे जेवण देण्याचे अविरत कार्य सुरू आहे.
--बॉक्स--
लॉकडाऊनमध्ये तीन वेळ जेवणाचा पुरवठा
कोरोनामुळे मागील वर्षी लॉकडाऊन लागल्याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी लंगरच्या माध्यमातून तीन वेळ जेवणाचा पुरवठा करण्यात आला होता. शहरातील सिंधी कॅम्प येथील लंगर हॉलमध्ये जेवण बनविण्याचे संपूर्ण काम चालते. येथे स्वयंपाक करण्यासाठीही परिसरातील महिला मोफत सेवा देतात.
--बॉक्स--
दोन वर्षांपासून अविरत कार्य
अन्नदानाचे कार्य दोन वर्षांपासून अविरत सुरू आहे. गोरगरिबांना अन्नदान करून भूक भागविण्याच्या या निस्वार्थ कार्यात नानकरोटी ट्रस्टला शहरातील दान-दाते मोठ्या प्रमाणात जेवणाचे सामान देतात.