अकोला: पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मंगळवारी मध्यरात्री पकडलेली ३५ लाख रुपयांची रोकड मुंबईजवळील पनवेल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक अनिल भोईर यांची असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. भोईर यांनी बँकेतून रोकड काढल्याचा दावा करीत रामदासपेठ पोलिसांकडे कागदपत्रं सादर केली. मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवित असताना, रामदासपेठ पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून जाणार्या कारला अडविले. कारची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीमध्ये ३५ लाख रुपयांची रोकड सापडली होती. पोलिसांनी नवी मुंबई येथील गणेश म्हात्रे, धनाजी तांडेल आणि गजानन वानखेडे यांच्याविरुद्ध कलम ४१(१), (४) नुसार कारवाई करून त्यांना अटक केली होती. यादरम्यान, त्यांच्यासोबतचा खरात नामक व्यक्ती फरार झाला होता. पोलिसांनी कार व रोकड जप्त केली होती. प्लॉट खरेदीसाठी ही रक्कम आणण्यात आली होती. असे चौकशीतून स्पष्ट झाले होते. परंतु, या रोकडचा मालक कोण, हे समोर आले नव्हते. गुरुवारी पोलिसांनी मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पनवेल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल भोईर हे रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि बँकेतून रोकड काढल्यासंबंधीचे कागदपत्रं पोलिसांना सादर केले. त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून रोकड काढून परिचिताना दिली होती, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
३५ लाखांच्या रोकडचा मालक पनवेलचा नगरसेवक !
By admin | Updated: December 18, 2015 02:18 IST