अकोला: जिल्ह्यातील अधिकतर मुख्याध्यापकांचे बँक खाते क्रमांक नसल्याने गत तीन वर्षांपासून २५ टक्के शाळा प्रवेशाचा निधी सर्वशिक्षा अभियानाकडे पडून आहे, परिणामी जिल्ह्यातील सर्वच शाळांना २५ टक्के शाळा प्रवेशाच्या निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, या अनुषंगाने आर.टी.ई. अँक्ट २00९ अन्वये शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांमार्फत अशा विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षणात शाळेत प्रवेश देण्यात येत असून, तसा अहवाल सर्व शिक्षा अभियानाला सोपविण्यात येतो. या नंतर संबंधित शाळांना २५ टक्के शाळा प्रवेशाचे अनुदान मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. परंतु, जिल्ह्यातील शाळांना गत तीन वर्षांपासून २५ टक्के शाळा प्रवेशाचे अनुदान मिळाले नाही. या बाबत विचारणा केली असता, जिल्ह्यातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षा अभियानाला त्यांचे बँक खाते क्रमांक सादर केले नसल्याचे समोर आले. परिणामी गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही शाळेला अनुदानाची रक्कम मिळाली नसून, शाळांची आर्थिक कुचंबना होत आहे. या बाबत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांमार्फत प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना निवेदन देण्यात आले असून, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विविध संघटनांमार्फत करण्यात येत आहे.
बँक खाते क्रमांकाच्या प्रतीक्षेत अडकला २५ टक्के आरक्षणाचा निधी
By admin | Updated: December 24, 2015 02:53 IST