अकोला : शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीन खरेदीसाठी २ कोटी ३0 लाख ८९ हजारांच्या प्रस्ताव गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठविला. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचा उपसा करण्यासाठी आठ पम्पिंग मशीन कार्यान्वित आहेत. यामध्ये १९७६ साली २५ एमएलडी प्लान्टवर तीन मशीन, तर १९९८ मध्ये कार्यान्वीत केलेल्या ६५ एमएलडी प्लान्टवर पाच अशा एकूण आठ पम्पिंग मशीन बसविण्यात आल्या होत्या. एका पम्पिंग मशीनची क्षमता १0 ते १२ वर्षे असताना दोन्ही प्लान्टवरील मशीनला अनुक्रमे ३८ व १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अर्थातच आठही मशीन कालबाह्य झाल्यामुळे त्यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठा योजनेवर होत असून, नागरिकांना त्रास होत आहे. साहजिकच जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन पम्पिंग मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून केवळ विचाराधीन होता. तत्कालीन भारिप-बमसंच्या महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या कार्यकाळात जलशुद्धीकरण केंद्रावरील एसीबी (एअर सर्किट ब्रेकर) बदलण्याचा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला. त्याकरिता ५0 लाख रुपये खर्च करण्यात आले. पम्पिंग मशीन खरेदीच्या निधीसाठी मनपाने १६ फेब्रुवारी २0१५ रोजी ठराव संमत केला. हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सोपविण्यात आला होता. यामध्ये १0 टक्के लोकवर्गणी जमा करण्यास मनपाने संमती दिली, परंतु पुढे हा प्रस्ताव रखडला. उन्हाळ्य़ाचे दिवस लक्षात घेता, हा प्रस्ताव मंजूर होणे नितांत गरजेचे होते. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांनी मार्च महिन्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर केला. पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी पुढाकार घेत गुरुवारी अर्थमंत्री मुनगंटीवार व पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांच्याकडे प्रस्तावाची शिफारस केली
२ कोटी ३0 लाखांच्या प्रस्ताव शासनाकडे
By admin | Updated: March 20, 2015 01:12 IST