आंबोडा (अकोला): येथील १६ वर्षे वयाच्या मुलीचा धावत्या ऑटोरिक्षामधून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आकोट ते आंबोडा रस्त्यावर आंबोडा शिवारात घडली. येथील दीक्षा अजय इंगळे ही मुलगी आकोट येथील लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. ती शुक्रवारी शाळा संपल्यानंतर आंबोडा येथे येण्याकरिता एमएच ३0 पी ७९९७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये बसली होती. आकोटकडून ऑटोरिक्षा वेगाने येत असताना आंबोडा शिवारानजीक धावत्या ऑटोरिक्षामधून दीक्षा खाली पडल्यामुळे जखमी झाली. तिला तातडीने आकोट ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद अजय सिपाजी इंगळे यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्या फिर्यादीमध्ये त्यांनी आकोलखेड येथील ऑटोचालक कमरशहा इस्माईलशहा याने त्याचा ऑटोरिक्षा वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्यामुळे दीक्षाचा ऑटोरिक्षामधून पडून मृत्यू झाला असल्याचे नमूद केले. या फिर्यादीवरून आकोट पोलिसांनी ऑटोचालक कमरशहा ईस्माईलशहा यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या २७९,३0४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, त्याला आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख करीत आहेत.
आंबोडा येथील १६ वर्षीय मुलीचा ऑटोतून पडून मृत्यू
By admin | Updated: April 18, 2015 01:49 IST