अकोला : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या भरतीला शुक्रवारपासून पोलिस मुख्यालयातील मैदानावर प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी १0४ उमेदवार भरतीसाठी पात्र ठरले. पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या एकूण २४८ रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार अकोला जिल्हय़ासह इतर जिल्हय़ातील जवळपास ८ हजारांवर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शुक्रवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी ३00 उमेदवारांना भरतीसाठी बोलाविण्यात आले होते. ३00 उमेदवारांपैकी १३१ उमेदवार भरतीसाठी हजर होते. यावेळी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी व शारीरिक चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणीमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेकसोबतच शारीरिक कवायती घेण्यात आल्या. उपस्थित १३१ उमेदवारांमधून १0४ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान २७ उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले. पात्र ठरलेल्या १0४ उमेदवारांची ५ किमी धावण्याची चाचणी शनिवारी सकाळी ५ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना शनिवारी सकाळी ४ वाजता पोलिस मुख्यालयात बोलाविण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस भरती प्रक्रियेचे समन्वय अधिकारी सुनील सोळंके यांनी दिली. भरतीची प्रक्रिया शनिवारीदेखील राबविण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी १0४ उमेदवार पात्र
By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST