अकोला : मंगळवारी धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्यासाठी अकोलेकरांनी सराफा बाजारात गर्दी केली होती. दिवाळीनंतर लगेचच लग्नसराई असल्यामुळे ग्राहकांचा सर्वाधिक कल सुवर्णालंकार खरेदीकडे दिसून आला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर १0 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने-चांदीची विक्री झाल्याचा अंदाज अकोल्यातील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला. सोने खरेदी ही केवळ परंपराच राहिली नसून, ते एक गुंतवणुकीचे साधन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोने-चांदीचे दर कमी असल्याने मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल, हे सराफा व्यावसायिकांना अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीचा आकडा १0 कोटी रुपयांच्या वर राहिला. गतवर्षी धनत्रयोदशीला सोने प्रतितोळा ३१ हजार ५00 रुपये, तर चांदी ५२ हजार रुपये किलो असे दर होते. त्यात घसरण सुरू झाल्याने नवरात्रापूर्वी सोन्याचे दर २७ हजार ५00 रुपयांवर येऊन स्थिरावले होते. मात्र, दिवाळीपूर्वीच सोन्याचे दर हजाराने वाढले. परिणामी मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी अकोला सराफा बाजारात सोन्याचे दर २८ हजार २00 रुपये प्रतितोळा, तर चांदी ४२ हजार रुपये किलो अशी होती. मुहूर्ताच्या दिवशी या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापार्यांनी वर्तविली होती. मात्र, तेच दर कायम राहिल्याने मुहूर्तावर सोने व चांदी खरेदीसाठी अकोलेकरांनी गर्दी केली. अनेक चाणाक्ष ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्ताची वाट न बघता आधीच सुवर्णालंकारांची खरेदी केल्याचे समजते. सुरक्षित आणि अधिक परतावा देणारा सोने हा विश्वासाचा पर्याय म्हणून चांगलाच विकसित झाला आहे.
मुहूर्ताच्या सोने खरेदीला १0 कोटींची झळाळी
By admin | Updated: October 22, 2014 01:18 IST